दिनविशेष ३ मे

दिनविशेष

दि. ०३ मे 

#WorldPressFreedomDay
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

रंगीबेरंगी कागदावर गुळगुळीत मजकूर छापणे हे वृत्तपत्र कर्त्याचे काम नव्हे, चालत्या काळाचे वर्तमान कळविणे व लोकांस योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे हे वृत्तपत्राचे कार्य आहे

१९९१ मध्ये युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेत याची शिफारस करण्यात आली होती. ( International Federation of Journalists ) त्यानंतर १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन घोषीत केला. तेव्हापासून, दरवर्षी ३ मे हा दिवस संविधानाचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो

पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली प्रसारमाध्यमांची भूमिका याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर माध्यमांच्या भूमिकेबद्दल साक्षरता आणण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. सध्याच्या युगात डिजिटल माध्यमं फोफावली असून त्यावर, चुकीची माहिती आणि अफवांचाही प्रसार वाढला आहे, त्यामुळे पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण झाली आहे


१. (१९१३) दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला. हा भारतातील पहिला चित्रपट होता

२. (१९६९) भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन

हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला

३. (१९७१) प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन

धनंजय गाडगीळ हे अर्थतज्ञ होते. त्यांनी भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी केली. गाडगीळ हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देखील होते

४. (१९७७)  मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन

हमीद दलवाई हे रॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे, मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतीरक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या दलवाई यांना मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान होते

५. (२०००) जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन

मराठी वाड्मय क्षेत्राबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या कर्तृत्वाने विलक्षण व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवणाऱ्या महत्त्वाच्या स्त्रियांमधील एक अपवादात्मक समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे होत. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, असे विविधांगी होते. व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात सुद्धा शकुंतलाताईनी काम केले होते

६. (२००९) जेष्ठ मराठी कवी, अमोघ वाणी लाभलेले वक्ते, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत मराठी साहित्यिक, ज्ञानमहर्षी राम शेवाळकर यांचे निधन

प्रा. शेवाळकर यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित अग्निमित्र हे त्यांचे विशेष पुस्तक विशेष गाजले. याशिवाय अभिज्ञान, शाकुंतल, भासाची नाटके, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे अनुवादही मराठी-संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. प्रा. शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

७. (२०११) गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन

वयाच्या १६ व्या वर्षी 'मानवते तू विधवा झालीस' हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते

त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे

#vishalinc5 #satara #सातारा 

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर