दिनविशेष १८ मे

दिनविशेष 

१८ मे

#InternationalMuseumDay
* आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जगभरात साजरा करण्याची कल्पना प्रथम इंटरनेशनल काउंसिल ऑफ म्यूजियम द्वारे मांडली गेली आणि 1977 पासून हा दिवस १८ मे रोजी साजरा करण्यास सुरवात झाली. लोकांना इतिहासबद्दल माहिती देण्यासाठी व त्यासंबंधी वस्तू जपण्यासाठी जगभरातील संग्रहालये चांगले कार्य करत आहेत

१. (१६८२) छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रूपांतर बलाढ्य मराठा साम्राज्यात करणारे शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) यांचा जन्म

२. (१८४६) मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन

ते मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता

३. (१९२१) शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म

अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द,वि, पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.

४. (१९४६) भारतीय कवी आणि समीक्षक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मल्याळम भाषेतील साहित्यिक  के. सच्चिदानंदन यांचा जन्म

५. (२०२०) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार रत्‍नाकर मतकरी यांचे निधन

मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील होते. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी नाटक शिकवले

वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, बालनाट्य व सूत्रधार या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील शरदाचे चांदणे व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते.

बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली आहेत

२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य अ‍ॅकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर