दिनविशेष २९ एप्रिल
दिनविशेष
दि. २९ एप्रिल
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस
दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर ( २९ एप्रिल १७२७ ) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था( इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन-ITI ) ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स. १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते
नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे
१. (१८४८) भारतीय चित्रकार आणि कलाकार राजा रवि वर्मा यांचा जन्म
भारतीय कलेच्या इतिहासातील महान चित्रकारांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची कामे पूर्णपणे भारतीय संवेदना आणि प्रतिमाशास्त्रासह युरोपियन कलेच्या संमिश्रणाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या चित्रांचे परवडणारे लिथोग्राफ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रसिद्ध होते, ज्यामुळे चित्रकार आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पोहोच आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला. शिवाय, हिंदू देवतांचे त्यांचे धार्मिक चित्रण आणि भारतीय महाकाव्ये तसेच पुराणातील चित्रांना प्रचंड प्रशंसा मिळाली
२. (१८६७) भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म
ते एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. मुंबई उपनगरीय रेल्वेत गर्दीमुळे अपघात होतात. डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६साली केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले. आज आपल्याला जे हवे आहे ते डॉ. भिसे यांनी १८९८ मध्येच निर्माण केले. आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत
३. (१९९९) मराठी अभिनेते, दिग्दर्शक मोहन गोखले यांचे निधन
त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. १९७२ साली मोहन गोखले यांना 'घाशिराम कोतवाल' या नाटकात एक छोटी भूमिका मिळाली. नाटकातली त्यांची 'दिव्य करायला जाणाऱ्या ब्राम्हणा'ची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर त्यांनी सतीश आळेकर यांचे 'महापूर' हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचेच 'मिकी आणि मेमसाब', सतीश तांबे यांचे 'बीज' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटके होती. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर', 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. जब्बार पटेल यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटामधे ते महात्मा गांधी बनले होते
४. (२०२०) सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचे निधन
ते असे भारतीय अभिनेते होते ज्यांनी हिंदी चित्रपट, तसेच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून मीडियामध्ये म्हटले जाते. खान यांची कारकीर्द ३० वर्षांपेक्षा जास्त काळ चालली आणि त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक आशियाई चित्रपट पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. नेमसेक, स्लमडॉग मिलियोनेर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे ते प्रकाश झोतात आले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment