दिनविशेष २२ मार्च
दिनविशेष
दि. २२ मार्च
जागतिक जल दिन
सन १९९३ पासून २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. ताज्या पाण्याचे महत्त्व आणि या नैसर्गिक स्त्रोताच्या व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस (World Water Day) साजरा केला जातो
जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी, सजीवसृष्टीची कल्पनाही करता येणार नाही. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे, जे सेवन करता येत नाही. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे
१. (१९२४) मराठी नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म
स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले 'उद्याचे जग' हे त्यांचे पहिले नाटक. त्यांची पटकथा असलेले आलिया भोगासी, पहिले प्रेम, सप्तपदी, ह्याला जीवन ऐसे नांव हे चित्रपट फार गाजले
२. (१९७०) हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली
१९७० मध्ये समाजसुधारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाज सुधारणेच्या उद्देशाने मुस्लिम सत्यशोधक मंडळाची पुणे येथे स्थापन केली. मुस्लिमांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व यामुळे स्त्रियांची होणारी घुसमट यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने लढा दिला
३. (१९८४) मराठी साहित्य विश्वात आपल्या लेखनाने वादळ निर्माण करणारे व मोलाची भर टाकणारे विचारवंत, ख्यातनाम लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात पाध्ये ह्यांना इंग्लिश वाड्मयाची आवड लागली. जॉर्ज बर्नाड शॉ आणि एच. जी. वेल्स हे त्यांचे आवडते लेखक होते. प्रभाकर पाध्ये यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या हाताखाली शिकून अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी मिळवली होती. 'सौंदर्यानुभव' ह्या त्यांच्या ग्रंथासाठी सन १९८२ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता
Comments
Post a Comment