दिनविशेष दि. २० मार्च
दिनविशेष
दि. २० मार्च
जागतिक चिमणी दिन
ज्या चिऊताईच्या चिवचिवाटाने सकाळी जाग यायची, तिच्या संवर्धनाची मोहीम कधी हाती घेतली जाईल, याची कल्पना कुणी केली होती काय? चला तर मग, चिऊताईसह पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि निर्धार दृढ करू या
नेचर फोरेव्हर सोसायटीचे संस्थापक असलेले नाशिकचे मोहम्मद दिलावर यांना असा दिन असावा अशी कल्पना सुचली. त्यांनी २० ते २५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या साथीने प्रयत्न केल्यावर २०१० साली हा दिन अस्तित्वात आला
आंतरराष्ट्रीय आनंदी दिन
आनंदी राहता यावं यासाठी अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असं नाही. मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना आरोग्याप्रति जागरुक करण्यासाठी प्रत्येक वर्षी २० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला जातो
संयुक्त राष्ट्रानं इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्याची घोषणा केली. २०१३ सालापासून हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. २०१३ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन भूटानची राजधानी थिम्पूमध्ये साजरा केला गेला. त्यानंतर हळूहळू हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला
जागतिक मौखिक आरोग्य दिन
मौखिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन वर्ल्ड डेंटल फेडरेशनतर्फे साजरा केला जातो. हा दिवस प्रौढ आणि बालकांसाठी उत्तम मौखिक स्वच्छतेच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करतो
१. (१९२०) प्रतिभावंत नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचा जन्म
प्रेक्षकांना झपाटून टाकतील अश्या नाटकांची कानेटकर यांनी निर्मिती केली. रायगडाला जेंव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले व हिमालयाची सावली या कलात्मक नाटकांनी व सुर्याची पिल्ले, लेकुरे उदंड जाहली, गगनभेदी, प्रेमाच्या गावा जावे अशा व्यावसायिक नाटकांनी त्यांनी मराठी रंगभुमीला नवी झळाळी प्राप्त करुन दिली
२. (१९२७) महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला
सामाजिक सबलीकरण दिन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे यासाठी सत्याग्रह केला होता. यामुळेच २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारताभर साजरा केला जातो
३. (१९५६) मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन
सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावचे सुपूत्र, मराठी नवकाव्याचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी बाळा सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर यांचे निधन
दुसऱ्या महायुद्धानंतरची समाजातील वेदना व निराशा त्यांनी आपल्या काव्यातून उमटवली. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे
४. (२०१४) भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन
ते इंग्रजी भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, पत्रकार होते
५. (२०१५) पसरणी ता. वाई, जि. सातारा गावचे सुपुत्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचे निधन
ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. साने गुरूजींकडून राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचं बाळकडू त्यांनी आत्मसात केलं. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत, हैदराबाद मुक्ती संग्रामात आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे 'गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment