४. २३ ऑगस्ट जागतिक वडापाव दिन, *सातारा मधील खाऊगल्ली - "पाटील वडेवाले" अर्थात पाटील स्नॅक्स*

सातारा मधील खाऊगल्ली - "पाटील वडेवाले" अर्थात पाटील स्नॅक्स

आज २३ ऑगस्ट जागतिक वडापाव दिवसाच्या निमित्ताने, गेल्या २५ वर्षाहून अधिक काळापासून सातारा करांना रूचकर वडापाव खाऊ घालणाऱ्या साताऱ्यातील प्रसिद्ध *"पाटील वडेवाले" अर्थात पाटील स्नॅक्स* या हॉटेलची माहिती घेणार आहोत.


भूक लागल्यावर... नाश्त्यासाठी... मित्रांसोबत गप्पा मारताना किंवा प्रवास करताना... अशा प्रत्येक वेळी आठवतो  तो 'वडापाव'. छोटंसं दुकान ते पंचतारांकित हॉटेल पर्यंत सर्वांना दखल घ्यायला लावणारा वडापाव कोणाला आवडत नसेल अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळच! चला तर या जागतिक वडापाव दिनी *पाटील वडेवाले अर्थात पाटील स्नॅक्स* या हॉटेलची सफर करूया...

तस म्हंटल तर सातारा आणि वडापावच एक वेगळचं नात आहे. साधारण १९७० ते १९८० या कालावधीत सातारा शहरात वडापावचा उदय झाला. त्याचवेळी १९८९ साली श्री. संजय गणपत पाटील व त्याच्या पत्नी सौ. वैशाली पाटील यांनी कर्मवीर पथ येथे छोट्या हातगाड्यावर वडापावचा व्यवसाय सुरू केला. तो सुरू केलेला वडपावचा व्यवसाय आज "पाटील वडेवाले" म्हणून सातारकरांना चविष्ट वडापाव खाऊ घालत आहे. 

पाटील वडेवाले यांची मुख्य शाखा आता कर्मवीर पथावर, सातारा शहर पोलीस स्टेशनजवळ, भोसले चौक येथे आक्टोबर २०२० पासून चालू झालेली आहे. ती पहिल्यांदा होती त्या गिते बिल्डिंग ठिकाणावरून इथे स्थलांतरित करण्यात आलेली आहे याची आवर्जून नोंद घ्यावी अशी सूचना मालक संजय पाटील यांनी यावेळी केली. ही शाखा सातारा बाजार समितीकडून पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्याच्या बरोबर समोर आहे. तीन रस्ते जिथे एकत्र होतात त्या भोसले चौकात प्रशस्त जागेत नवीन मुख्य शाखा सुरु आहे. शाखेमध्ये एकाच वेळी ४० लोक बसून वडापावचा आस्वाद घेऊ शकतात एवढा प्रशस्त हॉल नवीन शाखेत आहे. शाखेसमोर गाडी लावण्यास मुबलक पार्किंगचीही सुविधा आहे. शाखा सकाळी ८ ते संध्याकाळी १० वाजेपर्यंत सेवा पुरवते. शाखेमध्ये पार्सलची सोयही उपलब्ध आहे. 

पाटील वडेवाले शाखेत भेट दिल्यानंतर तिथे असणारी स्वच्छता, टापटीपपणा चांगला होता. त्यामुळे लोकांना तिथे बसल्यानंतर प्रसन्न वाटत होते. पाटील वडेमधील मधील वडापावचा आस्वाद लॉकडाऊन नंतर बराच काळानंतर घेतल्यानंतर सुद्धा वडापावच्या चवीमध्ये कोणताचं फरक जाणवला नाही. वडापावच्या बरोबर मिळणारी खोबऱ्याची चटणी पूर्वीसारखी तितकीचं स्वादिष्ट होती. वडापाव बरोबरचं हॉटेलमध्ये बरेचसे खाद्यपदार्थ विक्रीला उपलब्ध होते. त्यामध्ये दहीवडा, मिसळ, भजी, समोसे, कचोरी, पॅटिस, ढोकळा, जिलेबी, उपवासाचे शाबुदाणे वडे हे पदार्थ होते. येणाऱ्या काळात तिथे स्वीट पदार्थ (मिठाई) व थंड पेये (लस्सी, आईस्क्रीम) देण्याचा विचार असल्याचे मालक संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. सद्य स्थितीला तेथील वडापावची किंमत १५ रूपये प्रति अशी आहे. दिवसभरात १ हजारांहून अधिक वड्यांची विक्री आताच्या काळात होत असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. संजय पाटील यांना पदार्थाच्या गुणवत्तेबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणताही पदार्थ बनवून त्याची विक्री करताना फक्त फायदा विचारात घेत नाही तर त्याच्यापासून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो. ही काळजी म्हणजे ग्राहकांचे खरे समाधान आहे जे मागणीच्या स्वरूपात वाढत आहे. पाटील वडा नेहमी आरोग्याला उत्तम असाचं आहे, त्यामुळे खवय्ये वडापाव खायला पाटील वडेवाले हॉटेमध्ये गर्दी करतात असे त्यांनी यावेळी आम्हाला सांगितले.
पुढे चर्चेमध्ये अधिक माहिती विचारली असता मालक संजय पाटील यांनी त्यांच्या सातारा मधील इतर २ शाखांची माहिती आम्हाला दिली. पाटील वडेवाले यांची दुसरी शाखा गाळा नं २५, राजधानी टॉवर राजवाडा येथे सूरू आहे. तर तिसरी शाखा काहीचं दिवसांपूर्वी सयाजीराव गायकवाड महाविद्यालय रस्ता, सातारा जनता बँकेशेजारी, आय. डी. बी. आय. बँक येथे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणी खवय्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. येणाऱ्या काळामध्ये, लवकरच शाखेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण चालू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सातारा शहर व सातारा तालुका सोडून इतर ठिकाणी योग्य प्रस्ताव आल्यास फ्रेंचायजी देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तरी कोणी व्यक्ती इच्छुक असल्यास त्यांनी संजय पाटील यांच्याशी 9767552154 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

*पाटील वडेवाले अर्थात पाटील स्नॅक्स* या हॉटेलची जागतिक वडापाव दिनी केलेली सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आवश्य लिहा. 

लोकप्रिय खाद्य पदार्थ वडापाव चवीने खाणाऱ्या वडापाव प्रेमींना जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✍️ विशाल पवार 
दि. २३ ऑगस्ट २०२१
ठिकाण - पाटील वडेवाले,
भोसले चौक सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर