३. खेळ मांडला! (टोकियो ऑलिम्पिक २०२१)
खेळ मांडला! (टोकियो ऑलिम्पिक २०२१)
भारत हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १३५ कोटी आहे. अशा या बहुसंख्या असणाऱ्या देशाला टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये पदाकांची मिळालेली संख्या आहे फक्त ७. ही अशी ऑलम्पिक मधील अवस्था भारत देशाची का निर्माण झाली आहे ? यामध्ये येणाऱ्या वर्षात सुधारणा होतील का ? आणि सुधारणा करायच्या असतील तर काय करावे लागले ? याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.
खेळ हे नक्की कशासाठी खेळले जातात ? याचे उत्तर मी घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फक्त ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये मेडल मिळवण्यासाठीचं खेळ खेळले जातात असं नाही. खेळ हे आपण स्पर्धेसाठी तर खेळतोचं पण खेळणाऱ्या सर्व माणसांचे तसे नसते. काही लोक व्यायाम करण्यासाठी खेळतात, काही लोक कोणत्या परिक्षेतील चाचणी देण्यासाठी खेळतात, तर काही लोक त्यामध्ये करिअर करण्यासाठी खेळतात. अशी बऱ्याचश्या प्रकारची वेगवेगळी उदिष्टे लोकांच्या खेळ खेळण्याची असतात. पण जेव्हा कधी ऑलिम्पिक व इतर प्रकारच्या स्पर्धांच्या बातम्या तरूण मुले बघतात, त्याचे भव्य स्वरूप, खेळाडूंना मिळणारी बक्षिसे बघतात तेव्हा त्यांचा त्याकडे खेळण्याच्या व करिअर करण्याच्या दृष्टीने बघण्याचा विचार सुरू होतो. नाहीतर इतर वेळी आपण क्रिकेट हा खेळ सोडून खेळ या विषयाची चर्चा समाजात फार कमी करतो. त्याकडे भारतातील बहुसंख्य समाजाचे दुर्लक्षच असते. तर सर्वात अगोदर खेळ या गोष्टीकडे समाजाने सजगतेने पाहिले पाहिजे. खेळाने आपले शरीर निरोगी राहते, आपले मन प्रसन्न होते, खेळ खेळल्यामुळे आपणाला आव्हानाला सामोरे जाऊन जिंकण्याची काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. त्यासाठी संबंधित सरकारी संस्थांनीही (पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार) योग्य ती पाऊले उचलून खेळासाठी तशा सुविधा निर्माण करायला हव्यात. नाहीतर आपल्याकडे बऱ्याचं वेळा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेली जागा दुसऱ्याचं कारणांसाठी वापरली जातात. मैदानेचं नसतील तर खेळाडू खेळणार कसे...?
खेळाची संस्कृती व खेळाच्या साठी पायाभूत सुविधा निर्माण केल्यानंतर त्या खेळांडूंना निरंतर खेळता यावे यासाठी स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. नाहीतर वर्षभरात एकदा स्पर्धा झाली ती दुसऱ्याचं वर्षी होणार असं व्हायला नको. खेळाडूंना सतत खेळण्यासाठी वर्षभरात कशा प्रकारे स्पर्धा होतील याचा आराखडा त्या त्या खेळाच्या मुख्य संस्थेने / संघटनेने घेतला पाहिजे. त्या स्पर्धा निरंतर सातत्याने यशस्वीपणे आयोजित करायला हव्यातं. अशा स्पर्धांचे यशस्वी आयोजन क्रिकेट खेळात होते. क्रिकेट या खेळाचे वर्षभराचे वेळापत्रक असते आणि ते काटेकोरपणे पाळले जाते. त्यामुळे खेळाडू सतत त्या खेळात व्यस्त राहून त्यात उत्तरोत्तर प्रगती करतात. त्यात देशाच्या संघाची जगभरात प्रगती / उन्नती होते.
खेळात खेळांडूसाठी व खेळांच्या संघटनांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे खेळांचे अर्थकारण. जोपर्यंत आपण खेळांचे अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून योग्य व्यवस्थापन करत नाही तोपर्यंत सरकारने कितीही पैशांची मदत वा गुंतवणूक केली तरी आपण खेळाच्या क्षेत्रात पुढे जाता येणार नाही. आता यासाठी मी काही उदाहरण देऊ इच्छितो. भारतात क्रिकेट या खेळाने अर्थकारणाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे क्रिकेट हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचे आणि त्या संघटनेतील लोकांचे आयुष्य व्यवस्थित चालले आहे. पण इतर खेळातील संघटनांना (फुटबॉल, हॉकी, वैयक्तिक प्रकारचे खेळ वा इतर खेळ) आपल्या अर्थकारणाची योग्य घडी बसवता आलेली नाहीये. त्यामुळे त्या खेळातील खेळाडूंना वा संघटनेतील लोकांना एका कालावधीनंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी लोकांचा, उद्योग जगताचा आणि सरकारचा खेळासाठी आर्थिकदृष्ट्या पाठिंबा मिळणे खेळासाठी फार महत्त्वाचा असतो. तरचं तो खेळ मोठ्या प्रमाणावर वाढतो, त्याकडे तरूण मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. आणि देश म्हणूनही त्या खेळात आपण प्रगती करतो. आपल्याकडे वा जगभरात काही खेळांच्या मोठ्या स्पर्धा भरवल्या जातात. जगभरात फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, गोल्फ इतर खेळांच्या मोठ्या स्पर्धा भरवल्या जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. आपल्याकडेही क्रिकेट (IPL), कब्बडी (PRO कब्बडी) असे प्रयोग झाले आहेत. त्यातं काही मूलभूत त्रुटी आहेत. स्पर्धेचे असलेले स्वरूप, मालकांचा असलेला अतिप्रभाव आणि मनमानीपणा त्यामुळे सर्वचं इच्छुक आणि प्रतिभावान खेळाडूंना त्यामध्ये संधी मिळतेचं असे नाही. अशा काही त्रुटी दूर करून अशा प्रकारच्या स्पर्धांचे वर्षभर सातत्याने आणि पारदर्शकपणे आयोजन केले आणि सरकारनेही अशाचं प्रकारच्या स्पर्धा सुरू केल्या तर खेळसंस्कृती वाढण्यास आणि प्रगत होण्यास मदत होणार आहे.
कोणताही खेळाडू हा वयाच्या १५ व्या वर्षापासून खेळणे सुरू करून ३५ व्या वर्षापर्यंत खेळू शकतो. पण त्यानंतर काय त्याचा उदरनिर्वाह तो कसा करणार अशा प्रकारचे प्रश्न त्या खेळांडूसमोर निर्माण होतात. असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शालेय जीवनापर्यंत खेळात चांगले प्राविण्य असणारे खेळाडू आपले करिअर शालेय जीवनानंतर सोडून देतात. हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. खेळाडूंना भविष्याची हमी हवी असेल तर काही उपाययोजना कराव्या लागतील. तो खेळ निरंतरपणे आणि विविध स्तरांवर कसा चालू राहील, आणि लोकांचा त्याला कसा पाठिंबा मिळत राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खेळाडूंना नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण मिळते पण ते नोकरी करायला लागल्यावर त्यांचे कामामुळे खेळाकडे दुर्लक्ष होते आणि त्या खेळातील होणाऱ्या मोठ्या प्रगतीपासून देश मागे राहतो. आता ऑलिम्पिक चालू आहे म्हणून लोक खेळाबद्दल बोलत आहेत. चर्चा करत आहेत. पण काही दिवसानंतर लोक विसरून जातील. ते या विषयाकडे लक्ष देणार नाहीत. त्यामुळे आता चर्चा होत असलेल्या खेळांना तितकासा वाव मिळणार नाही, पाठिंबा मिळणार नाही. कोणती एखादी महत्वाची स्पर्धा आली की चर्चा करू पुन्हा विसरून जाऊ. खेळाडूंनी पदक मिळवल्यानंतर आर्थिक घोषणा करण्याबरोबरचं सरकारांनी निरंतरपणे खेळाच्यासाठी आर्थिक तरतूद करायला हवी. दुःखदायक म्हणजे यावर्षी केंद्र सरकारने ऑलम्पिक असून सुद्धा खेळाच्या बजेटमध्ये २३० कोटी रूपयांची कपात केली होती. तशी तक्रार काही खेळाडूंनी केलेली आहे.
एखाद्या स्पर्धेत देशातील खेळाडूंनी पदक जिंकल्यानंतर, त्याबद्दल जल्लोष करून, त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करून, मग काही दिवसानंतर त्याकडे दुर्लक्ष करणे हितावह नाही. खेळ हा निरंतर खेळण्याचा विषय आहे. हे लक्षात घेणे फार आवश्यक आहे. तसेच खेळाचे आरोग्य, मानसिक स्वास्थ, जिद्द, चिकाटी, धैर्य, एकता, खेळातील यशामुळे देशाचे जगात उंचावणारे स्थान या दृष्टिकोनातून आपण जोपर्यंत विचार करणार नाही. खेळ या विषयाची संस्कृती जोपर्यंत समाजात निर्माण होत नाही. त्याच्या अर्थकारणाचे व्यवस्थापन आपण जोपर्यंत करत नाही. तोपर्यंत आपण खेळ या विषयात प्रगती करू शकत नाही. तोपर्यंत आपली पदक संख्या डबल संख्येच्या घरातही जाणार नाही.
✍️ विशाल पवार.
दि. ८ ऑगस्ट २०२१
Comments
Post a Comment