१. सुनिता यादव (लेडी सिंघम) पोलीस खात्यात राहणार का...? तिचं पोलीस खात्यात राहणं महत्वाचं का आहे...!

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही,
मेरी कोशिक है कि ये सूरत बदलनी चाहिए।

दुष्यन्त कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे कार्य करणारी सुनिता यादव ही गुजरातच्या सूरतमधली वराछा येथील पोलीस हवालदार. टाळेबंदीच्या काळात कार घेऊन फिरायला निघालेल्या पाच जणांना तिने अडवलं. त्यांना सोडवायला त्यांचा मित्र आला. तो होता तिथले आरोग्य मंत्री कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश. सुनिताने त्यालाही हटकलं. मग त्याने तुला इथेच ३६५ दिवस ड्युटी करायला लावीन अशी धमकी दिली. त्यावर सुनिताने त्याला सांगितलं की मी सरकारची नोकर आहे. तुझ्या वडिलांची नाही. 

त्याने आपल्या वडिलांना फोन लावला. तर मंत्र्यांशी बोलतानाही ती मंत्र्याचं नाव असलेली कार असेल तर त्यात तुम्ही असायला हवं, तुमचा मुलगा असेल तर ते चुकीचं आहे, असं सांगताना दिसते. तिने तिच्या वरिष्ठांना हा सगळा घटनाक्रम सांगितल्यावर त्यांनी तिला ड्यूटी सोडून घरी जायला सांगितलं. ते ऐकून सुनिताने सरळ राजीनामा दिला.

सुनिताच्या सांगण्यामधला सच्चेपणा, निडरपणा, स्पष्टवक्तेपणा अनेकांना भावला आहे. दबावापुढे न झुकता आपलं काम करण्याच्या तिच्या चोख वृत्तीमुळे लोकांनी तिला सोशल मिडीयावर जोरदार पाठिंबा दिला आहे. तिचा राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नाही असं म्हटलं जातयं. पण खरचं तिच्या कामाला खरचं न्याय मिळाला आहे का ? का तिला आपल्या कामाची शिक्षा मिळतेय... ? आज जे काही होतयं ते समाजातील आणि पोलीस खात्यातील वास्तव आहे हे समाजाने समजून घ्यायला हवं. आणि हे सुधारण्यासाठी पुढे यायला हवं. कोणी चांगलं आणि नियमाप्रमाणे काम करत असेल तर त्याचं असचं खच्चीकरण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून राजकारण्यांच्या इशाऱ्यावरून केलं जातं. कारण पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांंवर राजकारणी लोकांचा दबाव असतो. 

पण समाजात यापुढेही असचं चालू राहिलं तर कोणी दुसरी सुनिता यादव आपले काम निडरपणे करू शकेल का ? याचा विचार समाजाने करणे आवश्यक आहे. यासारख्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपण त्याला किती गांभीर्याने घेतो. त्या प्रश्नावर किती व्यक्त होतो... ? आपणाला जर पोलीस ही संस्था चांगली काम करावीशी वाटत असेल आणि सुनिता यादव सारख्या लोकांनी पुढं यावं असं वाटतं असेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा. त्यांना राजीनामा द्यावा लागू नये यासाठी राजकीय पक्षांवर दबाव वाढवायला हवा. नाहीतर हे असचं चालू राहणार आणि आपल्याला कधीही चांगली पोलीस व्यवस्था मिळणार नाही. 

- विशाल पवार.
दि. १९ जुलै २०२०

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर